कणकवली पटवर्धन चौकात मूक मशाल मोर्चा…
कणकवली, ता.०१ : उत्तर प्रदेश मधील हाथ्रस येथे युवतीवर झालेल्या अत्याचार आणि उत्तर प्रदेश सरकारची दंडेलशाही याचा ‘आम्ही कणकवलीकर’ आणि ‘सखी मंच’ यांच्यावतीने मूक मशाल फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. पटवर्धन चौक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान निघालेल्या या मूक मशाल फेरीमध्ये शहर आणि परिसरातील नागरिकांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
हाथरस मध्ये जी माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली त्याचा आम्ही कणकवलीकर नागरीक जाहीर निषेध करीत आहोत. जलदगतीने व कायदेशीर मार्गाने निर्णय प्रक्रिया पूर्ण करून नराधमाना जास्तीत जास्त कठोर शासन करावे अशी मागणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे कणकवलीतील नागरिक व सखी मंचाच्यावतीने करण्यात आली. तसेच प्रांताधिकार्यांना निवेदनही देण्यात आले. यात म्हटले आहे, उत्तर प्रदेश येथील स्थानिक प्रशासन ज्या प्रकारे दंडेलशाहीच्या जोरावर हे प्रकरण हाताळत आहे. अत्याचारीत युवतीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देता दडपशाहीने अंत्यसंस्कार करून नातेवाईकांच्या हक्काचे हनन केले आहे . त्याचाही आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. आमचा हा निषेध तुम्ही संबंधितापर्यंत पोचवावा अशी मागणी कणकवलीवासियांनी केली. यावेळी अर्पिता मुंबरकर, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. प्रतिमा नाटेकर, सुप्रिया पाटील, मेघा शेट्टी, डॉ. संदीप नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, नितीन म्हापणकर, विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, हनिफ पिरखान, सादिक कुडाळकर, संजय मालंडकर, समीर पाटील, डी पी तानवडे, संदेश पटेल, शेखर गणपत्ये, शैलेजा मुखरे, विनायक सापळे, रुपेश खाडये, अनिल हळदीवे आदी उपस्थित होते.