महेश अंधारी ; पितळ उघडे पडण्याच्या भीतीनेच हल्ला…
मालवण, ता.०१ : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील एका दलित युवतीवर काही नराधमांनी केलेला अत्याचार व तिच्या निधनानंतर पोलिसांनी तिच्या मृतदेहावर परस्पर केलेले अंत्यसंस्कार या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अडवित धक्काबुकी केल्याच्या प्रकाराचा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश उर्फ बाळू अंधारी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने स्वतःचे पितळ उघडे पडेल या भीतीने षडयंत्र रचून राहुल गांधी यांच्यावर पोलिसांकरवी भ्याड हल्ला केला आहे, अशी टीका अंधारी यांनी केली आहे.
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील एका दलित युवतीवर काही नराधमांनी केलेला बलात्कार करून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यात त्या पीडित तरुणीचे निधन झाल्यावर उत्तरप्रदेश पोलिसांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना येऊ न देता तिच्या मृतदेहावर स्वतःच परस्पर अंत्यसंकार केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे उत्तरप्रदेश मधील गुन्हेगारी विश्वाचा आणि पोलिस व सरकारचा दडपशाहीचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. उत्तरप्रदेश मधील योगी सरकार हुकूमशाहीने वागत आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आवाज उठविणारे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पीडित युवतीच्या घरी नातेवाईकांना भेटण्यास जात असताना योगी सरकारने पोलिसांकरवी राहुल गांधींना अडवून धक्काबुक्की केली. योगी सरकारचा हा भ्याड हल्ला असून एका मोठ्या नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला ही निषेधार्ह बाब आहे. भारतीय संस्कृतीत दुःखद प्रसंगात भेटण्यास जाण्याची परंपरा आहे, राहुल गांधी हे पीडित युवतीच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यास जात होते, कोणत्या आंदोलनास अथवा देश विरोधी काम करण्यास जात नव्हते. तरीही राहुल गांधींवर योगी सरकारने षडयंत्र रचून पोलिसांकरवी हल्ला केला. या अत्याचार प्रकरणात स्वतःच्या कारभाराचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच राहुल गांधींवर योगी सरकारने हल्ला केला आहे, या हल्ल्याचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आपण तीव्र निषेध व्यक्त करत असून हुकूमशाही माजविणारे योगी सरकार आता जास्त काळ टिकणार नाही, अशी टीकाही महेश अंधारी यांनी केली आहे.