आज पासून शुभारंभ; नागरिकांनी लाभ घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन…
सावंतवाडी ता.०२: येथील पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या “गजर थ्री आरचा” या उपक्रमाचा शुभारंभ आज आरोग्य सभापती परीमल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी बोलताना श्री.नाईक म्हणाले,पालिका कार्यालयाच्या शेजारील जागेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून रियुज,रीड्युस आणि रिसायकल अंतर्गत माणुसकीची भिंत,ज्ञानाचे दान आणि रिसायकल प्लास्टिक,असे तीन विभाग करण्यात आले आहेत.माणुसकीची भिंत या विभागात आपल्या घरातील वापरण्याजोगे जुने कपडे, इतर वस्तू,वह्या,भांडी आदी वस्तू या ठिकाणी नागरिकांनी द्यायच्याआहेत.तर या वस्तूंची आवश्यकता असलेल्या गरजूंनी त्या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे.तसेच ज्ञानाचे दान या विभागात आपल्या घरातील वाचण्याजोगी पुस्तके या ठिकाणी आणून द्यायची आहेत.ही पुस्तके पालिकेच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.तर रिसायकल प्लास्टिक या विभागात आपल्या घरातील पुनर वापरात येणारे प्लास्टिक याठिकाणी किलोवर घेतले जाणार असून त्याबदल्यात पालिकेने तयार केलेले वीस रुपये किमतीचे सेंद्रीय खत दिले जाणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान याचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच या उपक्रमात सहभाग घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नासिर शेख,नगरसेविका दिपाली भालेकर,शुभांगी सुकी,माधुरी वाडकर,भारती मोरे, बंटी पुरोहित,रसिका नाडकरणी,आसावरी शिरोडकर आदींसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.