चौके बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला होती उभी
वेंगुर्ला,ता.०२: वेंगुर्ला-कॅम्प येथून २४ सप्टेंबरच्या पहाटे चोरीस गेलेली एमएच-०७-एसी-०९३६ ही ज्युपिटर गाडी १ ऑक्टोबर रोजी मालवण-चौके बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला बेवारसरीत्या उभी असलेली आढळून आली. सदर गाडी वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा करुन ताब्यात घेतली.
वेंगुर्ला-कॅम्प परिसरातील उदय वारंग यांच्या मालकीची एमएच-०७-एसी-०९३६ ही ज्युपिटर गाडी घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये उभी करुन ठेवली होती. सदर गाडी दि.२३ रोजी रात्रौ ११ ते दि.२४ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरीस गेली होती. याबाबत वेंगुर्ला पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच गाडी मालक यांनी जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेल्या आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारात गाडी चोरीस गेल्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे पोलिसांमार्फतही तपास सुरु होता. गुरुवारी (दि.१ ऑक्टोबर) सकाळी ८च्या सुमारास मालवण-चौके येथील उदय वारंग यांचे नातेवाईक यांना सदर गाडी चौके बाजारपेठेत लावलेली आढळून आली. याबाबत त्यांनी त्याची कल्पना फोनवरुन श्री.वारंग यांना दिली. त्यानंतर गाडी मालक यांनी स्वतः खात्री केल्यानंतर त्यांनी तपासी अंमलदार पोलीस डी.बी.पालकर यांना फोनवरुन कळविले. त्यानुसार वेंगुर्ला पोलिस स्थानकातून पोलिसांना चौके येथे पाठविले. यावेळी चौके बाजारपेठ येथे कॉन्स्टेबल विठ्ठल धुरी यांनी पंचनामा करुन गाडी ताब्यात घेतली. मात्र, चोराचा पत्ता लागू शकला नाही. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल डी.बी.पालकर करीत आहेत.