हरी खोबरेकर ; भाजपच्या बालिश प्रवक्त्यांनी माहिती घेऊनच टीका करावी, जनतेची दिशाभूल करू नका…
मालवण, ता. ०२ : सागरी किनारा आराखड्यावरील जनसुनावणी ही न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य शासनाने घेतली. यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वैयक्तिक संबंध नाही. त्यामुळे याची माहिती नसणाऱ्या भाजपच्या बालिश प्रवक्त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
जनसुनावणीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री ठाकरे हे जिल्ह्यातील जनतेची चेष्टा करत असल्याची टीका काल भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केला होता. या त्यांच्या टीकेला श्री. खोबरेकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, सागरी किनारा आराखड्यावरील जनसुनावणी ही न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला केलेल्या सूचनेनुसार घेण्यात आली. यात पर्यटन मंत्र्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे याची प्रथमतः माहिती भाजपच्या बालिश प्रवक्त्यांनी घ्यावी. नंतरच आरोप करावेत. सीआरझेड हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार त्यावरील कार्यवाही संबंधित विभाग करते. याची माहिती या प्रवक्त्यांना माहीत नसेल तर त्यांना प्रवक्ते म्हणणे चुकीचे ठरेल. अशा प्रवक्त्याला नेमून भाजपची प्रगती होईल की अधोगती याचा विचार आता त्यांच्या पक्षाने केलेला बरा असा टोला श्री. खोबरेकर यांनी लगावला.
या जनसुनावणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मच्छीमारांच्या ज्या मागण्या होत्या त्या खासदार, आमदारांनी मांडल्या आहेत. त्याशिवाय केंद्रातील पर्यावरण, वन विभागाचे मंत्री यांची कोकणातील लोकप्रतिनिधी म्हणून या आराखड्यात आवश्यक बदल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आश्वासनही खासदार, पालकमंत्री, आमदार यांनी दिले आहे.
प्रत्येक वेळी दिशाभूल आणि आंदोलनाची भूमिका स्वीकारण्यापेक्षा भाजपच्या प्रवक्त्यांनी पर्यटनाच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पर्यटन मंत्र्यांकडे कितीवेळा पाठपुरावा केला हे जाहीर करावे असेही श्री. खोबरेकर यांनी म्हटले आहे.