कणकवली नगरपंचायत, कलमठ ग्रामपंचायत यांची संयुक्त कारवाई
कणकवली, ता.३ : कणकवली शहर आणि कलमठ ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र मच्छीमार्केट असतानाही कणकवली आचरा रोडवर लक्ष्मी चित्र मंदिर परिसरात बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना आज हटविण्यात आले. कणकवली नगरपंचायत आणि कलमठ ग्रामपंचायत यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
कणकवली आचरा मार्गावरील लक्ष्मी चित्र मंदिर परिसरात गेले काही महिने मच्छी विक्रेते व्यवसाय करत होते. रस्त्यालगत हा व्यवसाय सुरू असल्याने 11 मार्गावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे रस्त्यालगत मच्छी विक्रीचा व्यवसाय न करता कलमठ किंवा कणकवली नगरपंचायत मधील मच्छी मार्केटमध्ये बसूनच व्यवसाय करावा अशी सूचना या मच्छी विक्रेत्यांना यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. मात्र आजही आचरा रस्त्यालगत मच्छी विक्री सुरू असल्याचे लक्षात येतात कणकवली नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या पथकाने तेथील मच्छी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले तसेच यापुढेही आचरा रस्त्यालगत मच्छी विक्री करताना आढळून आल्यास मच्छी जप्ती तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. यावेळी कलमठ ग्रामपंचायतचे सदस्य संदीप मेस्त्री, निसार शेख, विलास गुडेकर, नगरपंचातचे सतीश कांबळे, विजय राणे आदी उपस्थित होते.