चार वाहनांचे नुकसान; हायवे ठेकेदाराचा चालक फरार…
कणकवली, ता.०३ : वागदे डंगळवाडी येथील अपघातात पलटी झालेल्या कार मधील जखमी चौघे जण मुबईचे आहेत. या जखमींना नेण्यासाठी आलेल्या ॲम्बुलन्सचा चालक आणि तेथे मदत करणारा मोटरसायकल स्वार हे सिमेंट मिक्सर च्या धडकेतून सुदैवाने बचावले आहेत.
क्रेटा कार मधील चौघेजण सायंकाळी सहाच्या सुमारास ओरस ते कणकवली असे येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे डंगळवाडी येथील पुलावर क्रेटा कार पलटी झाली. यात चालक देवाशिष खांडगा, स्वाती खांडगा, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा तन्मय खांडगा तसेच सौरभ अग्रवाल हे जखमी झाले. या सर्व जखमींना कणकवलीत आणण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका तेथे दाखल झाले होती. वागदे आणि ओसरगाव येथील ग्रामस्थ देखील जमा झाले. त्याच वेळी हायवे ठेकेदाराचा सिमेंट मिक्सर तेथे वेगाने आला आणि तेथील ॲम्बुलन्स आणि एका दुचाकीला धडक देऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाला. यात ॲम्बुलन्स आणि दुचाकी चे नुकसान झाले. सुदैवाने ॲम्बुलन्स चालक पंढरी सत्यवान जाधव आणि दुचाकीस्वार संतोष सहदेव सावंत हे बचावले. यादरम्यान सिमेंट क्रशरची टाटा टेम्पोलाही धडक बसली. यानंतर अन्य वाहनातून जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर फरार झालेल्या सिमेंट मिक्सर चालकाचा शोध सुरू होता.