कणकवली,ता.०४: तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.कोरोना काळात जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान करण्यात आला आहे. ‘श्रमिक पत्रकार संघ’ व ‘पोलीस सेवा संघटना’ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “कोरोना योद्धा” म्हणून त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भगवान लोके हे गेली काही दशके पत्रकारिता करताना जिल्ह्यातील प्रश्न मांडत आहेत. दैनिक पुण्यनगरी आणि सिंधुदुर्ग २४तास या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला आहे.कोरोना महामारीतही जनतेचे प्रश्न त्यांनी सक्रियपणे पत्रकारतेतून मांडले आहेत.कणकवली तालुक्यातील असलदे या गावाचे लोके अत्यंत सामान्य कुटुंबातून पत्रकारितेच्या क्षेत्रात आले. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ते सध्या कार्यरत आहेत. सध्या कोरोना महामारीने जगाला व्यापले आहे. अशा वेळी भगवान लोके यांनी पत्रकार संघाचे पदाधिकारी, आपले सहकारी आणि विविध सेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत आर्सेनिक अलबम गोळ्या व मास्क वाटप केले. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशात,राज्यात टाळेबंदी लागली.अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आपल्या जीवाची बाजू लावून कोरोनाशी लढत होते. अशावेळी भगवान लोके यांनीही आपला शक्य आहे तेवढा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
या कामाची दखल घेत ‘श्रमिक पत्रकार संघ’ व ‘पोलीस सेवा संघटना’ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. श्रमिक पत्रकार संघ ही महाराष्ट्रातील एक नामांकित पत्रकार संघटना आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेने पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध लढे दिले आहेत. तर ‘पोलीस सेवा संघटना’ महाराष्ट्र राज्य हि देखील शिवराज्य कामगार हक्क संघटनेशी संलग्न संघटना आहे. कामगार आणि समाजातील विविध घटकांच्या उत्थानासाठी हि संघटना काम करते. या दोन्ही नामांकित संघटनांनी पत्रकार भगवान लोके यांचा सन्मान केला असल्याने सर्वच स्थरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.