Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या'त्या' महिलेचा मृत्यू आमदारांच्या अपयशी कारभाराचा बळी...

‘त्या’ महिलेचा मृत्यू आमदारांच्या अपयशी कारभाराचा बळी…

विनोद सांडव ; रुग्ण तडफडताना शिवसेनेची गाजावाजा केलेली रुग्णवाहिका कुठे ?, आमदारांनी कोरोना काळात नौटंकी थांबवावी…

मालवण, ता. ०४ : आमदार वैभव नाईक यांचा सहा वर्षातील कारभार म्हणजे केवळ फोटोसेशन आणि प्रसिद्धी एवढाच आहे. त्यापलीकडे त्यांचे काही काम नाही. कोरोना काळातही त्यांची नौटंकी थांबलेली नाही. त्यांच्या मतदारसंघात रुग्णवाहिकाअभावी कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू होतो. ही दुर्दैवी घटना आमदारांचा अपयशी कारभार स्पष्ट करणारी आहे. अशी टीका मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
श्री. सांडव यांनी पत्रकात म्हटले आहे की, रुग्णवाहिकाअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने जर मृत्यू होत असतील तर शिवसेनेने मालवणात शोबाजी करून लोकार्पण केलेली रुग्णवाहिका दिखावा म्हणून आणली होती का ? मालवणातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू हा आमदारांच्या अपयशी कारभाराचाच बळी आहे. मालवणात डॉक्टर दिवस रात्र सेवा देत आहेत. डॉक्टर-आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र ज्या रुग्णालयात डायलिसीस मशीन वर्षभर धुळ खात पडतात. त्याची जोडणी पूर्ण होत नाही. अशा दिशाहीन कारभारात, अपुऱ्या साधन सामुग्रीत डॉक्टरांनी प्रामाणिक सेवा बजावली तरी अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्ण राम भरोसेच आहेत असेच म्हणावे लागेल.
जसा आमदारांचा कारभार तसाच मालवण पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार सुरू आहे. नगराध्यक्षांचा कोणताही लक्ष कोरोना रुग्णांच्या सेवा सुविधांकडे नाही असेच चित्र शहरात आहे. एखाद्या रुग्णाला ५ तास रुग्णवाहिका मिळत नाही रुग्ण तडफडतो अशावेळी पालिकेचे कोणतेही कर्तव्य नाही का ? ओरोस वरून रुग्णवाहिका येणार याची वाट पाहत रुग्णाने तडफडायचे आणि नातेवाईकानी बघायचे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. शासनाने कोरोना काळात सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदारांना २१ लाख निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी काही निधीतून प्रशासन कार्यालयात केवळ टेबल खुर्ची यांचीच खरेदी आमदारांनी केली का ? याबाबत आमचे वरिष्ठ माहिती घेत आहेत. मात्र जनतेचे जीव वाचवण्यासाठी यातील निधी खर्च झाला आहे का? ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावते. त्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनसे त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. एकूणच काल मालवणात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. मुलगा पॉझिटिव्ह, आईचा तडफडून मृत्यू ? कोण, कोण जबाबदार आणि कोणा कोणावर गुन्हे दाखल व्हावेत. हे जनताच सांगत आहे. आमदारांनी नौटंकी बंद करून जनतेचा आवाज ओळखावा.
कोरोना काळात मृत्यू दर वाढत आहे. आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. अशा स्थितीत जास्तीत जास्त आरोग्य सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी आमदारांनी मालवणात शवपेटी दिली. आमदारांना माणसे जगवायची आहेत की मारायची ? शवपेटी पेक्षा आता अधिक रुग्णवाहिका महत्वाच्या आहेत. हे आमदारांनी ओळखावे असेही श्री. सांडव यांनी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments