शर्वाणी गावकर;पाडलोस केणीवाडा येथील ग्रामस्थांच्या भेटीत दिला शब्द…
बांदा. ता. ०४: जनतेच्या समस्या सोडविणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे, येथील विकासकामे करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आरोंदा जि. प. मतदारसंघ सदस्य शर्वाणी गावकर यांनी पाडलोस येथे केले.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील पाडलोस-केणीवाडा येथे ग्रामस्थांच्या घेतलेल्या भेटीवेळी सौ. गावकर बोलत होत्या. यावेळी कवठणी माजी सरपंच शेखर गावकर, सावंतवाडी भाजपा युवामोर्चा सरचिटणीस काका परब, कवठणी उपसरपंच तथा बांदा मंडल सचिव अजित कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते सागर प्रभू, पाडलोस ग्रा. पं. माजी सदस्य हर्षद परब, ग्रामस्थ दत्ताराम कोरगावकर, अनंत नाईक, बंड्या कुबल, शंकर कोरगावकर, अमोल नाईक, पपु कुबल, संगम सातार्डेकर, गोविंद पराडकर, आनंद कुबल, वामन केणी, गोकुळदास परब, नवनाथ कोरगावकर, अमित नाईक, राकेश सातार्डेकर आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाही असे सांगून अनेक समस्यांवर आनंद कुबल यांनी सौ. गावकर यांचे लक्ष वेधले. अनंत नाईक, हर्षद परब, दत्ताराम कोरगावकर यांनी केणीवाड्यातील ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या शेखर गावकर यांच्यासमोर मांडल्या. जनतेची कामे कुणा अधिकाऱ्याकडून रखडली जात असल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत शेखर गावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत वेळप्रसंगी आमदार नितेश राणे यांचे या सर्व समस्यांकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात रक्तपुरवठा कमी असून सातार्डा येथील रक्तदान शिबिरात पाडलोस मधील युवकांनी रक्तदान केले होते. त्यामुळे सर्व पाडलोस ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थांना रक्तदान करावयाचे असल्यास तीन महिन्यानंतर पाडलोसमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करू, असे शेखर गावकर यांनी यावेळी सांगितले.