जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा; जिल्हा दौ-यावर येण्याची केली मागणी…
सावंतवाडी, ता.०४: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी महसूलमंत्री प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर जिल्ह्यातील महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा केली आहे. यावेळी श्री.गावडे यांनी आंबोली,चौकुळ,गेळे येथील समस्या,व धनगर समाजाचे प्रश्न, वेळाघर येथील नियोजित ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्याय न होता स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याविषयी, स्थानिक शेतकऱ्यांबाबत, मच्छीमाऱ्यांचे प्रश्न,या सर्वांविषयी त्यांनी महसूलमंत्री प्रदेशाध्यक्ष श्री.थोरात यांच्याशी चर्चा केली.तसेच महसूलमंत्र्यांना सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण यावेळी त्यांनी दिले.व बाळासाहेब थोरात यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्हा काँग्रेसला उभारी देण्यासाठी बाळा गावडे सक्रिय आहेत, उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने निष्ठावंतांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान बाळा गावडे यांनी पेलले आहे. बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा अल्प कालावधीत पक्षासाठी केलेले काम आणि धडपड पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्रियाशील जिल्हाध्यक्ष मिळाल्याचे गौरवोद्वार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काढले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघ सुद्धा काँग्रेस पक्ष काबीज करेल, आणि सावंतवाडीत आमदार सुद्धा काँग्रेससाच असेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला आहे.