दोन गट भिडले; डोक्यात काचेचा ग्लास फोडल्याने ग्रामपंचायत सदस्य जखमी…
बांदा,ता.०४: काल शहरातील गडगेवाडी येथे युवतीच्या छेडछाड प्रकरणी युवकाला झालेल्या मारहाणीला रात्री उशिरा वेगळेच वळण मिळाले. मारहाण केल्याच्या वादातून गोवा हद्दीतील हॉटेलमध्ये दोन गटात तूफान राडा झाला. यामध्ये शहरातील सत्ताधारी गटातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडल्याने वातावरण अधिकच चिघळले. आज दिवसभर यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण होते.
ग्रामपंचायत सदस्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यातील जखम खोलवर असल्याने ५ टाके घालण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात काल सकाळी युवतीच्या छेडछाड प्रकरणी एका युवकाला बेदम चोप देण्यात आला होता. रात्री उशिरा याचे पडसाद महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवरील गोवा हद्दीतील एका हॉटेलमध्ये उमटले. रात्री दोन्ही गट एकाच हॉटेलमध्ये पार्टी करत असताना सकाळी झालेला वाद पुन्हा उफाळून आला. यामध्ये दोन्ही गटात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. यामध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडण्यात आल्याने तो रक्तबंबाळ झाला.
त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी मित्रांनी दाखल केले. त्यावेळी त्याच्या डोक्यात ५ टाके घालण्यात आले. सदस्याला मारहाण करणारा युवक शहरातून गायब झाल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. या प्रकरणाची चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती.