Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकाळसे भंडारवाडीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीपात्रात आढळला...

काळसे भंडारवाडीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीपात्रात आढळला…

मालवण, ता. ०५ : तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथून कालपासून बेपत्ता असलेल्या भूषण हनुमंत प्रभू (वय-२८) या युवकाचा मृतदेह आज सकाळी काळसे बागवाडी जेटी नजीकच्या गणपती साना परिसरात नदीपात्रात आढळून आला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

काळसे भंडारवाडी येथील मोलमजुरी आणि नारळ काढण्याची कामे करणारा भूषण प्रभु हा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. काल सकाळी ९ वाजता त्याची आई त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली असता भूषण त्याच्या खोलीत आढळून आला नाही. त्यावर तो सकाळीच उठून नेहमीप्रमाणे कोणाच्यातरी मजुरीच्या कामास गेला असे घरच्यांना वाटले. त्यामुळे त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु दुपारनंतरही भूषण घरी न परतल्याने घरच्यांची चिंता वाढली. शेजारील तरुणांनी त्याला शोधण्यास सुरवात केली. तसेच पोलिस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क साधून भूषण बेपत्ता असल्याची खबर कट्टा पोलिस ठाण्यात देण्यात आली.
बेपत्ता भूषणची शोधाशोध सुरू असतानाच आज सकाळी गावातील काही तरुणांना काळसे गावाशेजारुन वाहणाऱ्या कर्ली खाडीपात्रात काळसे बागवाडी गणपती जेटी येथील गणपती साना नजीकच्या नदीपात्रात भूषणचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची खबर पोलिस पाटील आणि पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मालवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे रुक्मांगद मुंडे, योगेश सराफदार, एस. बी. पुटवाड, काळसे पोलिस पाटील विनायक प्रभु यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. गावातील बाळू खोत, मंगेश हळवी, संदीप नार्वेकर, बाळु आचरेकर, बाळा कोळगे, अजित परब , चिंतामणी प्रभु आणि स्थानिक ग्रामस्थ  यांच्या मदतीने भूषणचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. भूषणचे वडील हनुमंत प्रभु यांना घटनास्थळी आणून मृतदेहाची ओळख पटवून खात्री करण्यात आली. यावेळी पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच केशव सावंत, उपसरपंच उल्हास नार्वेकर , अण्णा गुराम, राजू परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आणि कर्मचारी एन. डी. चव्हाण यांनी शवविच्छेदन करून भूषणचा मृतदेह नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या ताब्यात दिला.
दरम्यान भूषण याला नदीपात्रात गळ टाकून मासे पकडण्याची आवड होती. त्या दरम्यान अपघाताने तोल जाऊन तो नदीत पडला असावा आणि त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी रुक्मांगद मुंडे यांची टीम याबाबत अधिक तपास करत आहे. भूषणच्या मागे आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments