सुरेशदादा पाटील ः राज्य सरकारच्या आरक्षण टिकवता आले नाही…
कणकवली, ता.०५ ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याची माहिती मराठा संघर्ष समितीचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी आज दिली. तसेच राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
येथील मराठा मंडळाच्या सभागृहात तालुक्यातील मराठा समाजाची बैठक झाली. यात समाजाचे कोल्हापूर येथील विजयसिंह महाडीक, मराठा नेते एस.टी. सावंत, लवू वारंग, सोनू सावंत, एस.एम, सकपाळ, भाई परब, सुहास सावंत आदी उपस्थितीत होते.
श्री.पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यामध्ये ५८ मूक मोर्चे, ४२ समाज बांधवांचे बलिदान, गेल्या ३० वर्षांपासूनचा प्रदीर्घ संघर्ष करून मराठा समाजाने नोकरीमध्ये १३ व शिक्षणामध्ये १२ टक्के आरक्षण मिळवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास ९ सप्टेंबरला अंतरीम स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. प्रत्येक जिल्हयामध्ये वेगवेगळी आंदोलने होत आहेत. शासनाने नोकरभरती जाहीर करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या विषयांवर निर्णायक लढा उभा करण्यासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापूर येथे राज्यातल्या प्रमुख मराठा संघटनांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परीषदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती व इतर प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून मराठा समाजाच्या हिताचे १६ मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले. प्रमुख मागण्यांबाबत शासन निर्णय घेण्याबाबत चालढकल करीत आहे. यासाठी १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे.
श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने हा बंद शांततेने यशस्वी करावा. बंद राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे करावा लागत असून बंदची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील .