दाजी चव्हाण ; मोंडकरांची टीका जिल्हा दौऱ्यावरील विनोद तावडेंना खुश करण्यासाठी होती का… ?
मालवण, ता. ०५ : स्वतःला नेते समजणाऱ्या विक्रांत नाईक यांनी पहिल्यांदा देवली गावातील स्वतःचे जनमत जाणून घ्यावे नंतरच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर टीका करावी. आधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यावे आणि नंतरच आपल्या अकलेचे तारे तोडावेत अशी टीका देवली शिवसेना शाखाप्रमुख दाजी चव्हाण यांनी पत्रकातून केली आहे. बाबा मोंडकर यांनी आदित्य ठाकरेंवर केलेली टीका ही जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांना खुश करण्यासाठी होती का? असा खोचक प्रश्नही त्यांनी पत्रकातून विचारला आहे.
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत नाईक यांनी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर टीका केली होती. त्याला देवली शाखाप्रमुख दाजी चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, नेतेगिरी करणाऱ्या विक्रांत नाईक यांनी आपण राहत असलेल्या देवली गावात स्वतःचे काय जनमत आहे याची प्रथम जाणीव करून घ्यावी. शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य असलेले हरी खोबरेकर यांना देवली गावासह मतदार संघातील जनता आपल्या घरातील सदस्य मानतात. गेल्या तीन वर्षांच्या काळात देवली गावासह मतदार संघात त्यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करताना गेली अनेक वर्षे न झालेली अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. चांदा ते बांदा योजनेंतर्गत प्रकल्प मंजूर करून घेत गावातील बेरोजगार पुरुष, महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे खोबरेकर यांच्यावर केलेली टीका ही हास्यास्पद असून विक्रांत नाईकांनी आपले गावासाठी काय योगदान आहे ते सांगावे. आपली धडपड दाखविण्यासाठी टीका करू नये. असा सल्ला श्री. चव्हाण यांनी दिला.
किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्या अडीअडचणीच्यावेळी हरी खोबरेकर हेच धावून गेले आहेत. तुमचे नेते, प्रवक्ते आपल्या आलिशान बंगल्यातून खाली कधी उतरलेच नाही. त्यामुळे त्यांना याची माहिती कशी असेल. खोबरेकर यांचे मतदार संघात काय कार्य हे जनतेत जाऊन माहिती करून घ्यावी नंतरच विक्रांत नाईक यांनी आपले अकलेचे तारे तोडावेत. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा गावात आपले अस्तित्व काय आहे हे पाहूनच टीका करण्याचे धाडस करा असेही श्री. चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.