स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे वेळीच अनर्थ टळला…
बांदा,ता.०५: मडूरा-परबवाडी येथे महिनाभरापूर्वी तुटलेल्या वीज वाहिन्या रविवारी सायंकाळी पुन्हा तुटल्या. लहान मुले खेळत असताना त्यांच्या शेजारीच विद्युतभारित वीज वाहिनी जमिनीवर कोसळली. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री उशिरा वीज कर्मचार्यांनी जीर्ण वाहिन्यांना पुन्हा ठिगळ जोडून वीजपुरवठा पूर्ववत केला. यावेळी ग्रामस्थ व वीज कर्मचार्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
मडूरा परबवाडी येथे महिनाभरापूर्वी वीज वाहिन्या कोसळल्या होत्या. त्यावेळी जीर्ण वाहिन्यांना तात्पुरते ठिगळ जोडून वेळ मारुन नेली होती. ग्रामस्थांनी जीर्ण वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी केली होती. मात्र वीज वितरण कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही.
रविवारी सायंकाळी आधी जोडलेली वीज वाहिनी पुन्हा तुटून जमिनीवर कोसळली. त्यावेळी लगतच लहान मुले खेळत होती. ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने गंभीर अनर्थ टळला. वीज कर्मचार्यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा ठिगळ जोडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी वीज कर्मचार्यांना जाब विचारला. मात्र त्यांनी अगतिकता दर्शविली. वीज वितरण कंपनीच्या चालढकल कारभाराबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. भविष्यात याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अविनाश परब यांनी उपस्थित केला आहे.