बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटनेची मागणी;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन….
ओरोस,ता.५:
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी प्राचीन बुध्द स्तूप आणि लेणी आहेत. मात्र या प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे संवर्धन करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे संवर्धन व्हावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क संघटनेने राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले आहे. याचाच एक भाग म्हणून बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क सिंधुदुर्ग संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क ही संघटना बौद्ध लेण्या व स्तूप यांचे संवर्धन व संशोधन करण्याचे काम करते. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्राचीन बौद्धकालीन अवशेष आहेत. यात अडम स्तुप (नागपूर), पवनी बुध्द स्तूप (भंडारा), त्रिरश्मी लेणी (नाशिक), बुद्ध स्तूप नालासोपारा आदी विविध ठिकाणी बौद्धकालीन अवशेष आहेत. मात्र या प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे संवर्धन करण्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. याकडे अनेक वेळा लक्ष वेधून ही संवर्धन केलं जात नाही. त्यामुळे या प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे संवर्धन व्हावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. पहिल्या टप्प्यात ५ ऑक्टोंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क सिंधुदुर्ग संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी संघटनेचे प्रभारी व्ही. बी. जाधव, सगुण जाधव, लाडू जाधव, भिमराव कांबळे, शिल्पा इंगळे, संजय कदम, सुरेश देगवडकर आदी उपस्थित होते.