प्रमोद जठार : वनस्पती संशोधन प्रकल्प पळविणाऱ्या सरकारचा धिक्कार…
कणकवली, ता.०६ : नाणार नको, सी-वर्ल्ड प्रकल्प नको तर कोकणचा विकास कसा करणार? याचे उत्तर शिवसेना आघाडी सरकारकडे आहे का असा सवाल करत, आडाळी येथील आयुर्वेद वनस्पती संशोधन प्रकल्प पळविणाऱ्या सरकारचा धिक्कार करत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली आहे
श्री जठार म्हणाले, सिंधुदुर्गात दोडामार्ग आडाळीत जागा देण्यास राज्यसरकार दिरंगाई का करत आहे?हेच का ते ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम ? केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सिंधुदुर्गात प्रकल्प व्हावा म्हणुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करतात. मात्र कोकणाच्या आमदारांच्या जिवावर उभे असलेले ठाकरे सरकारचे मंत्री प्रकल्प लातुरला पळवतात आणि इथले शिवसेनेचे आमदार खासदार गप्प बसतात ही दुर्दैवाची बाब आहे. नाणार ग्रीन रिफायनरी नको , सी वर्ल्ड नको , आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन केंद्र नको तर ठाकरे सरकारला हवे काय ?कोकणाचा विकास कसा करायचा आहे यांचे उत्तर शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील तसेच कोकणातील जनतेला द्यावे असे प्रमोद जठार म्हणाले.