बाबा मोंडकर ; आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन मंत्री ठाकरेंचे, राज्य शासनाचे लक्ष वेधणार…
मालवण, ता. ०६ : पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांसंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ७ ऑक्टोबर रोजी टीटीडीएस संस्थेमार्फत पोस्टकार्ड आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिक व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या घरातील व्यक्ती, कामगार आपल्या समस्या लाल शाहीने पोस्टकार्डवर लिहुन पर्यटन व्यावसायिक संकटात आहेत याविषयी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्टकार्ड पत्र पाठविणार आहेत.
हे आंदोलन पंधरा दिवस चालणार असून या कठीण प्रसंगात पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी पर्यटन व्यावसायिकांसोबत राहून खऱ्या अर्थाने पर्यटन व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी ११.३० वाजता तारकर्ली पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टकार्ड टाकून टीटीडीएस संस्थेमार्फत पर्यटन व्यावसायिक या आंदोलनाची सुरवात करतील. संस्थेच्या झेंडा लक्षवेधी आंदोलनात तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग, मालवण शहर, तोंडवळी या भागातील ९० टक्के पर्यटन व्यावसायिकांनी भाग घेतला. संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी व विविध हॉटेल, संघटनानी यात सहभाग घेतला. या आंदोलनात १५०० पेक्षा जास्त व्यावसायिकांनी सहभाग घेत सर्व संमतीने हे झेंडा लक्षवेधी आंदोलन आठवडाभर यशस्वी केले. परंतु पर्यटन विभागाने, राज्य सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी याची साधी दखलही घेतली नाही. निदान या पोस्टकार्ड आंदोलनच्या माध्यमातुन सरकारने जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आम्हा पर्यटन व्यावसायिकांना आहे असेही श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.
पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यानंतर बाजुचे गोवा राज्य मात्र पर्यटन व्यवसायाने बहरत असताना आम्ही मात्र पर्यटकांची वाट बघत बसले आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा हा शासनाने मान्यता एकमेव पर्यटन जिल्हा आहे. पूर्ण भारतात हा मान ना गोवा राज्याला आहे ना अन्य राज्याला तसेच काश्मीर मधील बर्फ सोडून आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्याचा विचार करता बीच, हिस्ट्री, कल्चर, ऍग्रो, नेचर, फूड टुरिझमने पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद भारतातील एकमेव असलेल्या या पर्यटन जिल्ह्यात आहे. गरज आहे की या सर्व गोष्टींचा सरकारने सेलींग पॉईंट म्हणून विचार करण्याची. टुरिझम कल्स्टरच्या माध्यमातुन डेव्हलपमेंट करण्याची. या जिल्ह्यासाठी स्वतंत्र पर्यटन कमिटी गठित करून पर्यटन व्यावसायिक जिल्ह्यात कसा उभारी घेईल यासाठी प्रयत्न करण्याचे. अशाप्रकारच्या अन्य मागण्या राज्यसरकारकडे पाठवूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही हे दुर्दैव आहे. व्यावसायिकांनी घेतलेली बँकेची कर्जे, त्यावरील थकीत हप्ते, वाढलेले व्याज, त्यासाठी बँकेची भरण्यासाठी सक्ती, रिसॉर्टच्या कामगारांचा पगार प्रश्न, चालवायला ज्याने भाड्याने घेतलेले हॉटेल त्यांची भाडे-डीपॉजिट समस्या, पर्यटन बंद काळातील वाढीव वीज बिले, पर्यटन सुरु केले आहे तरी पर्यटक अजून नाही, बंद काळातील नुकसानीची दखल यावेळी तरी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे घेतील अशी अपेक्षा आम्हा पर्यटन व्यावसायिकांना आहे. असेही श्री. मोंडकर यांनी पत्रकात म्हटले आहे. पोस्टकार्ड आंदोलनात जिल्ह्यातील व्यापारी संघटना व सर्व पर्यटन व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.