बाळू अंधारी यांची टीका; केंद्र शासनाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी…
मालवण, ता. ०६ : भारतीय स्टेट बैंक ही भारतातील सर्वात मोठी नामांकित बँक असून या बँकेच्या मालवण शाखेला सर्व सरकारी कामकाज असल्याने सामान्य ग्राहकांची किंवा व्यापाऱ्यांची गरज भासत नाही. या बँकेत स्टाफ नाही. स्टाफ असल्यास ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक दिली जाते. कुठलीही गोष्ट विचारायला गेल्यास सरळ उत्तर मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळू अंधारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, स्टेट बँकेच्या मालवण शाखेत मार्च महीन्यापासून आजपर्यंत पासबुक प्रिंटिंग बंद आहे. स्टेटमेंट मागितल्यास वहीमध्ये नोंद करा. मागाहून स्टेटमेंट मिळेल असे सांगितले जाते व स्टेटमेंटचा चार्ज आकारला जातो. प्रत्येक गोष्टीचे न विचारता खात्यामधून पैसे वजा केले जातात. ज्याप्रमाणे पैशाची आकारणी केली जाते. त्याप्रमाणे सेवा मिळत नाही असा आरोप श्री. अंधारी यांनी केला आहे.
कुठल्याही स्टाफ बद्दल मॅनेजरकडे तक्रार केली असता त्यांच्याकडूनही पुढची उत्तरे मिळतात. उलट त्यांच्याकडून स्टाफचीच बाजू घेतली जाते. अनेकवेळा नेट, मशीन बंद आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे असे सांगितले जाते. मोबाईलवर एसएमएस सिस्टीमकरिता खात्यातून पैसे वजा केले जातात. परंतु आपले पैसे जमा झाले की नाही याचा मेसेज येत नाही. या बँकेत खरेदी खतासाठी चलन भरायचे असल्यास वेबसाईट उपलब्ध नाही म्हणून दोन दोन दिवस थांबावे लागते. असे या बँकेचे वेगवेगळे अनुभव आले आहेत. इतर बँकेच्या तुलनेत या बँकेची सेवा समाधानकारक नाही. त्यामुळे या बँकेच्या कारभाराची केंद्र शासनाने योग्य ती दखल घेत ग्राहकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणीही श्री. अंधारी यांनी केली आहे.