सुरेश सावंत यांची नीतेश राणेंकडे मागणी; जिल्ह्यातील उसाला प्रतिटन ८०० रुपयांचे नुकसान…
कणकवली, ता.६: सिंधुदुर्गातील उसाची तोड उशिरा होते. यात ऊस उत्पादक शेतकर्यांना प्रतिटन ८०० रुपयांचे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांची बैठक घ्यावी तसेच डी.वाय.पाटील कारखान्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपचे राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी केली आहे.
श्री.सावंत यांनी राणेंकडे केलेल्या मागणीत म्हटले की, दसर्याच्या मुहूर्तावर ऊस कारखाने सुरू होत आहेत. त्यापूर्वी ऊस तोडणीचे काम सुरू होत आहे. मात्र घाटमाथ्यावरील उसाची तोडणी आटोपल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ऊस तोड कामगार सिंधुदुर्गात पाठवले जातात. त्यामुळे उसाचा दर प्रतिटन ४०० रुपयांनी कमी मिळतो. तर तोडणी झाल्यानंतर ट्रकमध्ये ऊस भरण्यासाठी पुन्हा प्रतिटन ४०० रुपये द्यावे लागतात. राज्यात अशी परिस्थिती कुठेच नाही. राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना प्रतिटन २८०० रुपये दर दिला जात असला तरी सिंधुदुर्गातील शेतकर्यांना मात्र ८०० रुपये प्रतिटन तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऊस शेती करणे सध्या परवडेनासे झाले आहे. अनेक शेतकर्यांनी उसाची शेतीही बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील ऊस तोडणी वेळेवर व्हावी आणि ट्रक भरण्यासाठीचाही दर रद्द व्हावा अशी इथल्या ऊस उत्पादक शेतकर्यांची मागणी आहे. त्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी सुरेश सावंत यांनी निवेदनातून केली आहे.