मागण्यांबाबत अतिरिक्त सचिवांनी चर्चेस बोलविल्याने घेतला निर्णय…
ओरोस, ता. ०६ : विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून पुकारलेले लेखणी बंद आंदोलन मंगळवारी सकाळी तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मागण्यांबाबत उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयात नोंदणी व मुद्रांक शुल्क महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी चर्चेसाठी बोलावल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सावंत यांनी दिली. त्यामुळे आजपासून जमीन खरेदी, दस्तऐवज, विवाह नोंदणीची कामे पूर्ववत झाली आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभाग संघटनेच्या विविध व न्याय मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ ऑक्टोबर पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान जिल्ह्यातील २३ अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ५ ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन यशस्वी झाल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. तसेच जमीन खरेदी, दस्तऐवज नोंदणीची कामे ठप्प झाली होती.