नगरपंचायत, पोलिसांची गांधीगिरी…
कणकवली, ता.६: कणकवली शहरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम गेले आठ दिवस सुरू आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे आजपासून नगरपंचायत आणि कणकवली पोलिसांनी विनामास्क फिरणार्यांकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्याबरोबर त्यांना मास्कचे वितरण आणि त्याचे महत्व पटवून देण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. आज कणकवली बाजारात विनामास्क फिरणार्या १६ जणांकडून प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे ३२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर मास्क वापराने टाळता येणारा कोरोना संसर्ग याबाबतचे प्रबोधनही करण्यात आले. या उपक्रमात नगरपंचायतीचे प्रवीण गायकवाड, प्रशांत राणे, विजय राणे, पोलिस हवालदार विश्वजित परब, चंद्रकांत माने सहभागी झाले होते.