जिल्हाधिकार्यांना निवेदन;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी…
बांदा,ता.०६: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र निश्चित केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने प्रवास व निवासी व्यवस्थेबाबत पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री, आमदार व लोकप्रतिनिधींनी याबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून जिल्ह्यातच परीक्षा केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी तसे निवेदनही जिल्हाधिकार्यांना सादर केले आहे.
१३ अॉक्टोबर रोजी सीईटी परीक्षा होत असून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. एसटी किंवा अन्य वाहनाने प्रवास करणे तसेच परीक्षा दरम्यान निवास करणेही धोकादायक आहे. कणकवली व कुडाळ येथे परीक्षा केंद्राची सुविधा असतानाही विद्यार्थ्यांना संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
पालकमंत्री, आमदार तसेच लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. कणकवली किंवा कुडाळ येथे सीईटी परीक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. विद्यार्थ्यांनी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.