प्रमोद जठार; नवख्या काँग्रेसी मंत्र्याकडून प्रकल्प पळवण्याची दादागिरी…
कणकवली, ता.०७ : मुख्यमंत्री शिवसेनेचा असुनसुद्धा आघाडी सरकार मधील एक नवखा काॅंग्रेसचा मंत्री शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंताच्या पत्रांना उत्तरे सोडा साधी भेट सुद्धा देत नाहीत. त्यामुळे काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तुम्हाला आता पुरते ओळखले आहे. ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी मर्द सेना राहिलेली नाही अशी टिका भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
श्री.जठार यांनी संतप्त इशाराही दिला आहे की जर वनस्पती संशोधन प्रकल्प सिंधुदुर्गात झाला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गात फिरकु देणार नाही. आम्ही आमच्या प्रयत्नाने आणलेला प्रकल्प निदान राखण्याचे तरी कर्तृत्व दाखवा, अन्यथा अशा कोकणसाठीच्या बिनकामाच्या नेत्यांचे सिंधुदुर्गातील फिरणे बंद करावे लागेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील केंद्राच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेद संशोधन प्रकल्प हस्तांतरणावरून सुरू झालेला वाद अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प पळवून नेण्याच्या आपल्याच आघाडी सरकारमधील सहकारी मंत्र्यांचा धिक्कार केला असून आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली आहे.
त्यांच्या या भूमिकेवर भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी कडाडून टीका केली आहे. “मुख्यमंत्री शिवसेनेचा असुनसुद्धा आघाडी सरकार मधील एक नवखा काॅंग्रेसचा मंत्री शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत व कुठल्याही पक्षात असले तरी ज्यांची विकास कामे कमी पण राजकारणातील तंत्र नेहमीच उच्च राहिले अशा उदय सामंताच्या पत्रांना उत्तरे सोडा साधी भेट सुद्धा देत नाहीत, धत् तुमच्या मर्दानगीवर! काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तुम्हाला आता पुरते ओळखले आहे. ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी मर्द सेना नसुन सत्तेसाठी हिंदुत्व सोडुन काहीही करण्यासाठी मा. उद्धव ठाकरेंना भाग पाडणारी लाचार राऊत-सेना आहे. ही काय काेकणाचा विकास करणार? किमान सांगु तरी नका की अमित देशमुखसारखा नवखा मंत्रीही तुम्हाला भेट देत नाही, तुमच्या पत्रांना उत्तर देत नाही. आम्हाला लाज वाटते सांगायला की हे असले आमच्या कोकणाचे नेते आहेत, ज्यांच्या नाकावर टिच्चून एक नवखा काँग्रेसी मंत्री दिवसाढवळ्या कोकणाच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आम्ही मंजुर करुन आणलेला प्रकल्प पळवताे हे कोकण वासीयांचे दुर्दैव आहे.