सुशांत नाईक यांची माहिती; खासदार विनायक राऊत यांचा पाठपुरावा…
कणकवली, ता.७: मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात कलमठ ते झाराप या दरम्यान असलेल्या जोड रस्त्यांच्या २५ मिटर भागाचे डांबरीकरण होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी यासाठीचा पाठपुरावा केला आहे. हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनकडून येत्या महिन्याभरात हे काम होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आज दिली.
श्री.नाईक म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण ते जानवली या हद्दीपर्यंत महामार्गाला जोडणार्या रस्त्यांचे डांबरीकरण, गतिरोधक, सूचना फलक आदींची कामे केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीने पूर्ण केली. मात्र कलमठ ते झाराप या कामाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीने ही कामे पूर्ण करण्यास टाळाटाळ केला होता. त्यामुळे ही बाब आम्ही खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली.
नाईक म्हणाले, सध्यस्थितीत महामार्गाचे जोड रस्ते तीव्र उताराचे आणि खड्डेमय झाले आहेत. त्याचा मोठा त्रास वाहन चालकांना होत आहे. मात्र पुढील एक महिन्यात कलमठ ते झाराप हद्दीमधील सर्व जोड रस्त्यांचे डांबरीकरण करून देण्याची ग्वाही ठेकेदाराने खासदार श्री.राऊत यांना दिली आहे. तर जोड रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाबाबत आम्हीही लक्ष ठेवून असणार आहोत.