Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापूर्वजांनी निर्माण केलेल्या देवराया जतन करणे गरज...

पूर्वजांनी निर्माण केलेल्या देवराया जतन करणे गरज…

सुभाष पुराणिक; वन्य पशुपक्षी यांच्या दिवसात मानवी हस्तक्षेप नको…

सावंतवाडी,ता.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरण रक्षणासाठी पुर्वजांनी देवराया निर्माण केल्या,त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केली.वन्य पशु पक्षी यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप नको, निसर्गसौंदर्य संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.वन्य जीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण आयोजित ऑनलाईन वेबीनार मध्ये “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य जीव व व्यवस्थापन” या विषयाची मांडणी सुभाष पुराणिक यांनी केली.
ते म्हणाले,सध्या वनविभागाकडे फक्त ११ टक्के जंगल आहे. उरलेल्या ८९ टक्के वर फार मोठ्या प्रमाणात कायद्याचा अंमल रहात नाही. खाजगी क्षेत्राला अडचण करणे लोकही मान्य करणार नाहीत. त्यामुळे त्यांचे समर्थन रहाणार नाही. पण असे क्षेत्र आहे की ते लोकांनी देवराया सांभाळून ठेवलेल्या आहेत. आपल्या कडे ५०० च्या वर देवराया असतील. आज बहुतांश ठिकाणची वृक्ष संपदेचा ऱ्हास झाला आहे. देवराई क्षेत्र भविष्यात इतर कामासाठी वापरलेही जाईल. देवराई क्षेत्र कायमस्वरूपी आहे. तसेच रहाण्यासाठी एकतर ते वने केले पाहिजे किंवा समूह राखीव केले पाहिजे. त्यामध्ये बकूळ, नागचाफा, हेळा, खरशींग, पाडळ, देवनाळ, धूप, कडूकवठ, पिंपळ, बुरंबी, गारवेल आदी झाडे लावून त्या देवरायांचे रक्षण व संवर्धन केले पाहिजे असे श्री.पुराणीक म्हणाले. देवराईची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे फळबागायती, पाणी, वृक्षवल्ली पाहिल्यावर मन प्रसन्न होते. त्यातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणाचे दर्शन घडते.सजीव सृष्टीचे संवर्धन झाल्यास पशू-पक्षांचा अधिवास नष्ट होत नाही. जिल्ह्यातील जैवविविधता अन्नसाखळी विपूल प्रमाणात असल्याने जिल्ह्यात प्रचंड विविधता आहे, असे सुभाष पुराणीक म्हणाले.त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण झाले असल्याचे आपण मानले पाहिजे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजगर ठिकठिकाणी सापडतात त्यांना पकडून फोटोग्राफी केली जाते. याउलट त्यांना पळवून लावले पाहिजे. जिल्ह्यातील जीवसृष्टीत साप वन्य पशुपक्षी त्यांची विविधता आपल्याला सहज जाणवते मगरी देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचे नैसर्गिक खाद्य मासे आहेत. पण कोंबडी किंवा माशांचे मास टाकतात ते लोकांसाठी घातक आहे,असे देखील पुराणीक यांनी सांगितले.
सध्या दुर्मिळ होत चाललेले पाणमांजर देखील आपल्याकडे सापडते ते पर्यावरण दृष्ट्या फारच महत्त्व आहे. याशिवाय रान कोंबड्यांची शिकार देखील केली जाते. ती थांबायला हवी, रानडुकरांची शिकार केल्याने बिबटे खाद्यासाठी लोकवस्तीकडे येतात असे ते म्हणाले. मोर सापांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो.त्यामुळे पक्षी सृष्टीतील विविधतेचे संरक्षण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जीवसृष्टी अधीवासात मानवी हस्तक्षेप झाला नाही तर शेकरू, माकड लोकवस्तीत येणार नाहीत. हल्ली शहरातील लोक वानर, माकडाला खाद्य घालतात त्यामुळे त्यांनी नैसर्गिक अधिवास सोडून लोकवस्ती किंवा लोक वर्दळीत राहणे पसंत केले आहे, हे घातक आहे असे ते म्हणाले. वन्यप्राण्यांचे भ्रमण मार्गांचे संरक्षण केले पाहिजे जंगली हत्ती बिघडल्यानंतर त्यांच्यात पुन्हा सुधारणा होत नाही असे चित्र सिंधुदुर्गात आलेल्या जंगली हत्तींच्या मुळे पाहायला मिळत आहे. एक जंगली हत्ती तिलारी खोऱ्यात आहे, त्याला नैसर्गिक अधिवासात खाद्य मिळते त्यामुळे तो जगंलातच आहे. मात्र अन्य चार जंगली हत्ती लोकवस्तीत किंवा फळबागात येतात त्यामुळे हत्ती बिघडवले जाऊ नयेत असे श्री. पुराणिक यांनी सांगितले.पर्यावरण आणि पर्यटनाची सांगड घातली पाहिजे लोकांना सहज पशु पक्षी दिसायला लागले तर पर्यटनाची वृद्धि होईल आणि ती रोजगाराची संधी देखील निर्माण होईल. खाजगी किंवा वनखात्याच्या जंगलात वृक्षतोड होत आहे. खाजगी जंगलात वृक्षतोड करताना पुन्हा वृक्ष संवर्धन करत नाहीत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो यासाठी पुन्हा वृक्षसंवर्धन देखील करण्याची गरज आहे, असे सुभाष पुराणिक यांनी सांगितले.यावेळी वन व खाजगी जंगलासह जीवसृष्टी,पशु पक्षी आणि जैवविविधता व्यवस्थापन बाबत श्री. पुराणिक यांनी सचित्र माहिती दिली. यावेळी प्रा. धिरेंद्र होळीकर, डॉ गणेश मर्गज,प्रा. सुभाष गोवेकर, सतीश लळीत, महेंद्र पटेकर, शिवप्रसाद देसाई, अभिमन्यू लोंढे,प्रणाली भोसले, नंदन बिरोडकर, डॉ संजीव लिंगवत, डॉ सोमनाथ परब, शिवप्रसाद केरकर, चंद्रशेखर साळुंके,व अन्य वेबीनार मध्ये सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments