सार्वजनिक आरोग्यास अपायकारक कृती न करण्याचे डॉ.संजय पोळ यांचे आवाहन…
कणकवली, ता.७: कणकवली-नरडवे रस्त्यावर आज पुन्हा वापरलेले पीपीए कीट, मास्क आणि चायनीज जेवणाची पाकिटे आढळून आली. आरोग्य यंत्रणेने या सर्व वस्तूंची विल्हेवाट लावली. तसेच वापरलेले पीपीए कीट व इतर साहित्य उघड्यावर टाकून सार्वजनिक आरोग्यास अपायकारक कृती करू नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पोळ यांनी केले आहे.
मागील आठवड्यात नरडवे रस्त्यालगत हरकुळ बुद्रूक गावात वापरलेले पीपीए कीट आढळून आले होते. हरकुळ बुद्रूक ग्रामपंचायतीने या किटची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर आज पुन्हा याच परिसरात पीपीए किट, हातमौजे, मास्क आणि जेवणाची पाकिटे आढळली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन या वस्तूंची विल्हेवाट लावली.
रस्त्यालगत आढळलेली पीपीए कीट, मास्क या वस्तू शासकीय नाहीत. कोविड रुग्ण वाहतूक करणार्या रुग्णवाहिका वापरकर्त्याने अज्ञानातून हा प्रकार केला असावा अशी शक्यता डॉ.संजय पोळ यांनी व्यक्त केली. तसेच बायोमेडिकल वेस्ट असे उघड्यावर टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.