बांदा,ता.०७:
बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 समोरील वळणावर स्विफ्ट व वॅगनार कारमध्ये दुपारी 2.45 वाजताच्यासुमारास समोरासमोर अपघात झाला. अपघाताची तिव्रता पाहता सुदैवाने मोठा अनर्थ टळला. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली मात्र, दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. बांदा पोलिस निरीक्षक अनिल जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची पहाणी केली.
स्विफ्ट कारचालक शिरोड्याहून बांद्याच्या दिशेने तर वॅगनार कारचालक बांद्याहून शिरोड्याच्या दिशेने जात असताना जिल्हा परिषद शाळा नं.1 पाडलोस येथील वळणावर गाड्या एकमेकांना न दिसल्याने अपघात झाला. अपघाताची बातमी समजताच संबंधितांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याने चालकांच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर बांदा पोलिसांना माहिती देण्यात आली.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची ये-जा नव्हती. परंतु या ठिकाणी शाळा असल्याकारणाने मार्गाच्या दोन्ही बाजूंनी गतीरोधक उभारण्याची मागणी यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. तसेच बांदा शिरोडा मार्गावर कोंडुरा, दांडेली, न्हावेली, पाडलोस, मडुरा ते शेर्ले पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झुडपे असल्याने समोरून येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. अनेक वेळा झुडपे तोडण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागावर कोणताच परिणाम होत नसल्याने असे अपघात होत असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. अखेर दोन्ही गाड्यांच्या चालकांनी एकमेकांत सामोपचाराने प्रकरण मिटविले.
पाडलोसमध्ये रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. अनेक वेळा मागणी करूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभाग अजून किती अपघात पाहणार असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.