तत्कालीन भाजपमंत्र्यांचा प्रताप ः वैभव नाईक यांची माहिती
कणकवली, ता.०८ ः आडाळी येथे प्रस्तावित असलेला वनस्पती संशोधन आयुर्वेद प्रकल्प भाजपचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला पळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प सिंधुदुर्गात आणला. आता या प्रकल्पाच्या अनुषंगाने २० ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज दिली.
श्री.नाईक म्हणाले, भाजपचे नेते प्रमोद जठार हे वनस्पती संशोधन प्रकल्पाच्या मुद्दयावर खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाहक टीका करत आहेत. खरे तर भाजपच्याच मंत्र्यांनी दोन वर्षापूर्वी आडाळी येथील प्रकल्प पळविण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांना हा प्रकल्प जळगावात न्यायचा होता. मात्र खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होण्याबाबत ठाम भूमिका घेतली. त्यामुळे प्रमोद जठार यांनी प्रसिद्धीसाठी अनाठायी आरोप करू नयेत. वनस्पती संशोधन प्रकल्पाबाबत भाजपमंत्र्यांनी घेतलेली भूमिका आधी तपासून घ्यावी. तसेच हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.