अतिवृष्टीची नुकसान भरपाई तसेच रेशन दुकानात धान्य देण्याची केली मागणी
सावंतवाडी ता.०८: इन्सुली-शेत्रफळ गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा,अशी मागणी उपसरपंच कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली.दरम्यान अनेक रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रारी त्यांनी यावेळी श्री.म्हात्रे यांच्याकडे केली.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,गेल्या दोन महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे इन्सूली – क्षेत्रफळ गावातील भातशेतीचे नुकसान झाले आहे भात शेती पाण्याखाली बुडून राहिल्याने कुजली आहे.त्यामुळे भात शेती परिपक्व होत असताना पुराच्या पाण्यामुळे जमिनीला भिडली आहे.या कुजून गेलेल्या भातशेती मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतीचे बांधही वाहून गेले आहेत. शेतीचे बांध जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळी आपत्ती आलेली असल्याने महसूल व कृषी विभागाने हातातोंडाकडे आलेल्या शेतीची नुकसानीचे आणि उरलेल्या भाताचे पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा,तसेच इन्सुली – क्षेत्रफळ गावातील रेशन कार्ड धारक यांच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आले आहे.गेली काही वर्ष रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नाही. धान्य मिळेल म्हणून आश्वासने दिली जातात परंतु ते मिळत नसल्याने अतिवृष्टीमुळे दुष्काळ सारखी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गासमोर आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना रेशन धान्य मिळायला हवे, मात्र ते रेशन कार्ड अजूनही मिळत नाही याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.रेशन कार्ड वर धान्य देण्यासाठी इन्सुली गावातील सर्व वंचित शेतकऱ्यांना आमरण उपोषण करावे लागेल त्यासाठी महसूल यंत्रणेने तात्काळ खबरदारी घेऊन वंचित रेशन कार्डधारकांना धान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सचिन सावंत, दत्ताराम सावंत, प्रभाकर पेडणेकर, प्रदीप सावंत, हेमंत राणे, राजाराम कोठावळे, अविनाश सावंत, आप्पा उर्फ बाबलो कोठावळे, नंदू नाईक, सखाराम पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.