प्रमोद जठार ः आडाळीतील प्रकल्प आठ दिवसांत मंजूर करा अन्यथा आमदार, खासदारांच्या घरापुढे घंटानाद
कणकवली, ता.८ ः वनस्पती संशोधन प्रकल्पासाठी अचानक लातूर जिल्ह्याचे नाव कसे आले? याचा खुलासा आमदार वैभव नाईक यांनी करावा. तसेच आडाळीला हा प्रकल्प मंजूर झाल्याचे पत्र आठ दिवसांत आणावे अन्यथा सिंधुदुर्गातील शिवसेनेचे दोन आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आम्ही घंटानाद आंदोलन करू असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी आज दिला.
श्री.जठार म्हणाले, आयुर्वेद वनस्पती संशोधन प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग आणि जळगाव हे दोन जिल्हे शर्यतीत होते. यात जळगावला हा प्रकल्प होणे शक्य नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील आडाळी येथे हा प्रकल्प करावा असे पत्र केंद्रीय आयुष मंत्री राजेश कोटेचा यांनी राज्य शासनाला दिले होते. त्यामुळे भाजपचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प जळगावला पळविण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र सिंधुदुर्गात मंजूर झालेला हा प्रकल्प अचानक लातूरला पळविण्याचा घाट का घातला गेला याचा शोध आधी आमदार वैभव नाईक यांनी घ्यावा.
श्री.जठार म्हणाले, आयुर्वेद संशोधन प्रकल्प आडाळीला न झाल्या महाराष्ट्रात अन्य कुठेही होऊ देणार नाही अशी भाषा खासदार विनायक राऊत बोलत आहेत. त्यामुळे आता हा प्रकल्प आडाळीत आणण्याची जबाबदारी त्यांची आहे. तसेच शिवसेनेचे आमदार देखील हा प्रकल्प आडाळीत होणार असल्याची ग्वाही देत आहेत. त्यामुळे आता पुढील आठ दिवसांत आयुर्वेद प्रकल्प आडाळीला मंजूर झाल्याचे पत्र आमदार, खासदारांनी आणावे, अन्यथा त्यांच्या घरासमोर आम्ही घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री.जठार यांनी दिला.