राष्ट्रवादीचा आरोप; चौकशी करण्याची पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी…
सिंधुदुर्गनगरी,ता.०८: आंबोली खून प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडुन आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.त्यामुळे त्यांची चौकशी करा,अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.तर सावंतवाडीतील अवैध धंद्यात गुंतलेल्या मुलांचे व त्यांच्यासमवेत सहभागी असलेल्यांची चौकशी करा,व त्यांच्यावर कारवाई करा,अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आंबोली खुन प्रकरण व सावंतवाडीत अवैध धंद्याचे वाढलेले प्रमाण याबाबत कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार सामंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधूदूर्ग जिल्ह्याचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी आंबोली येथील मळगांवकर खुन प्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर कोणी कोणी केला,तसेच मळगांवकर खुन प्रकरणात जे वाहन वापरले त्या वाहन मालकासह या गाडीचा वापर अनेक महिने अवैध धंद्यासाठी केला जात होता. या सर्वावर गुन्हे दाखल करावेत. अवैध धंद्याच्या माध्यमातूनच मळगावकर खुन प्रकरण घडले आहे.यामध्ये मुळात जाऊन सखोल चौकशी करा,आणि पडद्या मागे असलेले शोधा. तसेच या प्रकरणात सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचार्यांची भूमिका संशयास्पद असून यांच्याकडून मळगांवकर मृत्यु प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची दाट शक्यता असून आरोपी व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना पाठिशी घालण्याचे काम ज्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केले.त्यांचीही चौकशी व्हावी. यापुढे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी व अवैध धंदे प्रकरणापासुन दुर राहण्यासाठी पालक व अल्पवयीन मुलांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण विविध सामाजिक संस्था मार्फत जिल्ह्यामध्ये नियोजन करावे.
सावंतवाडी तालुक्यातील दारू, मटका यासारखे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी कडक धडक मोहीम सुरू करावी.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेहमी सहकार्य मिळेल.
आंबोली घाटात सिंधूदूर्ग जिल्ह्य़ासह अन्य भागातील अनेक घातपाताचे मृतदेह टाकले जातात. याला आळा घालण्यासाठी आंबोली येथे स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी होती. आणि ती पोलीस चौकी मंजूर असल्याचे समजले ती त्वरित सुरू करावी.जेणे करून गुन्ह्य़ाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.तसेच जिल्ह्य़ातील महिला अत्त्याचार नियंत्रण विभाग सक्षमपणे कार्यान्वित करावा.अशा महत्वाच्या विषयावर पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी माजी राज्यमंत्री श्री प्रविण भोसले.जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक.व्यापार उद्योग सेल विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी. कार्याध्यक्ष हिदायतूल्ला खान आदी उपस्थित होते.