कांदळवनाच्या संवर्धनासाठी, रोजगार निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार ; आमदार नाईक
मालवण, ता. ९ : तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळावर आमदार वैभव नाईक यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्रयाखाली तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठानमार्फत कांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्यासाठी जागतिक बँकेने ३३८ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे वर्ग केले आहेत. त्याचप्रमाणे केंद्रशासनाने ६०० कोटीचा निधी यासाठी राखीव ठेवला आहे. हा निधी लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी प्रतिष्ठानच्या नियामक मंडळातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन पाठपुरावा केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेपासून ते सिंधुदुर्गपर्यत पसरलेल्या ७२० किमीच्या समुद्रक्षेत्रामध्ये खाडी व समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कांदळवनाच्या संवर्धनासाठी व त्यामधून रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आम. वैभव नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहामधून शासन नामनिर्देशित एका सदस्याला या नियामक मंडळावर घेण्याची शिफारस होती. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शासन नामनिर्देशित सदस्य म्हणून एकमेव आम. वैभव नाईक यांची नेमणूक झाली आहे. याबद्दल आम. नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठान ही तिवरांचे संवर्धन व सागरतटीय जैवविधतेचे संरक्षण करणारी देशातील एकमेव स्वायत्त संस्था आहे. तिवरे व सागरतटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठानच्या घडामोडींचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक मंडळ तसेच प्रतिष्ठानबाबत तत्काळ निर्णय घेण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना करून त्यावर अशासकीय शासकीय सदस्य व संस्था यांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने ही नव्याने नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियामक मंडळाच्या समितीमध्ये आम. नाईक यांना स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी नियुक्त केलेल्या या नियामक मंडळावर कांदळवन व सागरी जैवविविधताच्या विषयाचे तज्ज्ञ व्यक्ती म्हणून एफडीसीएम लिमिटेड नागपुरचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी मच्छीमार सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष रामदास शिंदे, या विषयावर काम करणाऱ्या अशासकीय संस्था म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक यांची निवड करण्यात आली आहे.