सकल मराठा समाजाची मागणी; कणकवलीत परीक्षा घेण्याला विरोध…
कणकवली, ता.०९: मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राज्यातील मराठा संघटनांकडून होत आहे. त्याचधर्तीवर कणकवली केंद्रात होणारी एमपीएससीची परीक्षा स्थगित करा अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे आज करण्यात आली. त्यामागणीचे निवेदन आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले.
कणकवली महाविद्यालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा केंद्र आहे. मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे कणकवलीतील परीक्षा केंद्रास आमचा विरोध आहे. मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक गैरकृत्य करू शकतात. कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. त्याचे पर्यावसन उद्रेकात होऊ शकते. हे टाळण्याकरिता नियोजित पूर्व परीक्षा राज्य शासनाकडून स्थगित करण्यात यावी असे निवेदन सकल मराठा समाज तालुका, कणकवली यांच्यावतीने आज प्रांताधिकार्यांना देण्यात आले.