तीन महिन्याचे वेतन रखडले ः विभागीय कार्यशाळेसमोर घोषणाबाजी…
कणकवली, ता.०९ ः शहरातील एस.टी.विभागीय कार्यशाळेसमोर आज एस.टी.कर्मचार्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. एस.टी.कर्मचार्यांना गेले तीन महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावे लागत असल्याचे एस.टी.कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव विनय राणे यांनी स्पष्ट केले.
आज राज्यभरात सर्वच एस.टी.विभागीय कार्यशाळेसमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. गेले तीन महिने वेतन नसल्याने एस.टी.कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही व्यथा एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करून शासन दरबारी मांडली आहे. तरीही सरकार या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहत नसल्याची खंत यावेळी एस.टी.कर्मचार्यांनी मांडली. आजच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणामध्ये एस.टी.कामगार संघटनेचे विनय राणे यांच्यासह सुरेंद्र मोरजकर, अनिल नर, प्रवीण कोंडरकर, मंगेश नानचे आदी सहभागी झाले आहेत.