संजू परब; पालिकेचे उत्पन्न बुडू देणार नाही,मासिक सभेत संकेत…
सावंतवाडी ता.०९: पालिकेच्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाचे उत्तर तीन महिन्यात न आल्यास इंदिरा गांधी संकुलातील गाळय़ाचे प्रतिमहा तीन हजार रुपये भाडे आणि अडीच लाख रुपये अनामत रक्कम गाळेधारकांकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.दरम्यान पालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देताना अडचणी येत आहेत.त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडू देणार नाही,असेही श्री.परब यानी स्पष्ट केले.येथील पालिकेच्या मासिक बैठकीत ते बोलत होते.
विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यानी गाळेधारकांकडून प्रीमियमच्या अडीच लाख रुपये रकमेपेक्षा आणखी अडीच लाख रुपये मागितल्याचा आरोप केला.याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान श्री.परब यांनी अडीच लाख रुपये मागणाऱ्या व्यक्तीबाबतचे पुरावे सादर करण्याचे आव्हान लोबो याना दिले.पुराव्याशिवाय आरोप करू नका,असेही श्री.परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.