Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोविड रूग्णांवरील उपचारासाठी जिल्हा रूग्णालय सज्ज...

कोविड रूग्णांवरील उपचारासाठी जिल्हा रूग्णालय सज्ज…

जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती;‘सिंधुदुर्ग आरोग्य मिशन’ शिष्टमंडळाशी चर्चा…

सिंधुदुर्गनगरी,ता.१०: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत.याचबरोबर व्हेंटिलेटर,ऑक्सिजन यासह आवश्यक तो सर्व औषधसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोरोना महामारीत रुग्णांवर व्यवस्थित उपचार करत आहे.आणि पुढेही उपचार करण्यासाठी सज्ज असून आपल्याकडे पुरेशी सुविधा आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
या महामारी कालावधीत जिल्ह्यातील जनतेला व्यवस्थित आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्यातील नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी सिंधुदुर्ग आरोग्य मिशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेज, सिव्हिल इंजिनिअर,डॉक्टर्स, पत्रकार, वकील तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्र येत हे मिशन सुरू केले आहे.‘नो प्रोटोकॉल, ओन्ली प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या मिशनची गुरुवारी कणकवलीमध्ये बैठक झाली. या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे या मिशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन नूतन शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण तसेच या रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी आदींची भेट घेऊन जिल्हा रुग्णालयात असलेली सद्यस्थिती जाणून घेतली. डॉ. चव्हाण यांनी या शिष्टमंडळाला जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी सुविधा असल्याचे स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात अशोक करंबेळकर, उमेश गाळवणकर, डॉ.प्रवीण सावंत, गणेश जेठे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील या भेटीनंतर शिष्टमंडळाने पत्रकारांना माहिती दिली. जिल्हा आरोग्य यंत्रणेबाबत उलट सुलट चर्चा असल्याने जिल्ह्यातील सामान्य माणूस कोरोना उपचाराबाबत गोंधळून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेला आवश्यक मदत करता यावी व लोकांपर्यंत काही समस्या असतील तर त्या सोडविण्याच्यादृष्टीने जाव्यात तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेवून आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी हे मिशन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेबाबतची योग्य ती माहिती समजून घेऊन त्यांना कोणत्या माध्यमातून मदत करणे शक्य आहे,हे जाणून घेण्यासाठी या मिशनच्या माध्यमातून शुक्रवारी जिल्हा रुग्णालयास भेट दिल्याचे या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात २२५ बेडची क्षमता आहे,सद्यस्थितीत याठिकाणी १२५ रुग्ण असून यापैकी ९६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर १९ निगेटिव्ह आहेत. जिल्हा रूग्णालयात त्यातील ४० आयसीयू बेड व ४० बेड ऑक्सिजन युक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या प्रति दिन ५०० लिटर ऑक्सिजन बनवणारा प्लांट कार्यान्वित झाला आहे. त्याशिवाय १७० ऑक्सीजनचे जंबो सिलिंडर होते. त्यापैकी ११ सिलिंडर वापरण्यात आले असून अद्यापही जिल्हा रूग्णालयात १५९ ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर उपलब्ध आहेत,तर४० व्हेंटिलेटर आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयामध्ये दोन फिजिशियन रुग्णांवर उपचार करत आहेत. रेमडेसिवीरची ४०० इंजेक्शन उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने प्रतिदिन २०० कोरोना चाचण्या केल्या जातात. या रुग्णालयात सिटी स्कॅन, एक्सरे मशीन, डायलेसिस, सोनोग्राफी या सुविधा सुरू आहेत. त्याचबरोबर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. मशिनरी बिघडल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी या रुग्णालयात बायो मेडिकल इंजिनियर उपलब्ध आहे, त्याचबरोबर रेडिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी यंत्रणा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले,अशीही माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस आदी डॉक्टरमधून लवकरच भरली जाणार आहेत. इच्छुकांना तात्काळ अपॉईंटमेंट देणार आहोत. यासाठी वैद्यकीय संघटनाशी संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वैद्यकीय संघटनांना विश्वासात घेतले जात नव्हते असे सांगताना यापुढे त्यांच्याशी संपर्क ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे डॉ. प्रवीण सावंत यांनी सांगितले.
उमेश गाळवणकर यांनी आपल्या नर्सिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या 20 नर्स जिल्हा रुग्णालयाला सेवा देण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा रुग्णालयात सर्दी, ताप आदी आजारावर उपचार घेण्यास लोक यायला घाबरतात. त्यामुळे उपचार घेण्यास विलंब होतो. मात्र कोरोना डिटेक्ट झाला तर काय या भीतीने लोक बोलत नाहीत. वेळेवर औषधोपचार न घेतल्याने मृत्यूचा धोका मोठा असल्याचे उमेश गाळवणकर यांनी सांगितले. नागरिकांची जिल्हा रुग्णालयाकडे बघण्याची भावना सकारात्मक करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे असेही श्री. गाळवणकर यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात १०८ च्या १२ अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध आहेत. यापैकी तीन अत्याधुनिक आहेत. या बारा रुग्णवाहिकांवर सेवा बजावण्यासाठी 36 डॉक्टरची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत 8 डॉक्टर काम करत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका असल्या तरी सेवा देण्यासाठी डॉक्टर आवश्यक आहेत. किमान एक तरी शववाहिका या रुग्णालयात असणे गरजेचे आहे. या शववाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेवून त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले.लहान मुलांना कोरोना संसर्ग लवकर होतो असे म्हणणारी डब्ल्यूएचओ ही आरोग्य यंत्रणा आता वेगळेच मत व्यक्त करीत आहे. त्यामुळे या संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न आहे, अशी शंकाही उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर डब्ल्यूएचओ नियमांचे पालन करायचे झाल्यास अनेक नागरिकांचे बळी जातील असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या नियमात अडकण्यापेक्षा स्थानिक पातळीवर काय करू शकतो ती सर्व मदत करून कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एखाद्या यंत्रणेच्या चुका त्रुटी काढत न बसता त्या यंत्रणेला सहकार्य करून पुढे जाण्याची भावना असणार्‍या नागरिकांनी या मिशनमध्ये सहभागी व्हावे यासाठी बाळू मेस्त्री-कणकवली तसेच आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या शिष्टमंडळाने यावेळी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments