आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी
कणकवली, ता.१० ः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद आंदोलन रद्द झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून कणकवली शहरासह तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यात वातावरण तापले आहे. तर राजकीय मंडळींच्या काही विधानांमुळे देखील समाजात दुही निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस यंत्रणेकडून सतर्कता बाळगली जात आहे.
कणकवली शहरात पटवर्धन चौक येथे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, यांच्यासह उपनिरीक्षक प्रकाश कदम, श्रीमती पाटील तसेच दहा पोलिस, दहा महिला पोलिस, दहा होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याखेरीज एक अधिकारी आणि पाच पोलिसांसह पेट्रोलिंग केले जात आहे. कणकवली शहर बाजारपेठेसह तालुक्यातील फोंडाघाट, कनेडी, वागदे, कासार्डे, तळेरे, नांदगाव, खारेपाटण या प्रमुख शहरात देखील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.