निवेदक तुषार सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…
सावंतवाडी ता.१०: येथील पालिकेच्या पर्यटन महोत्सवाची छान वाढविणारे मुंबईस्थित निवेदक तुषार सावंत यांचे काल रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांनी सावंतवाडी महोत्सवासह शिरोडा व वेंगुर्ले-उभादांडा येथील महोत्सवांची सूत्रे सांभाळली होती.तर भारदस्त आवाजामुळे त्यांनी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.दरम्यान त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
सावंतवाडी महोत्सव आपल्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून त्यांनी याठिकाणी आपले अनेक चाहते निर्माण केले होते.भाषाशैलीवरील प्रभुत्व आणि शब्दावरील उत्कृष्ट पकड यामुळे त्यांनी सूत्रसंचालन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निवेदनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर शहारे येत असत. सिंधुदुर्गात सुरुवातीला सावंतवाडी महोत्सव आणि त्यानंतर शिरोडा व वेंगुर्ले उभादांडा महोत्सव तसेच सीएम चषक आदी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करून त्यांनी सिंधुदुर्ग वासियांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.