समीर नलावडे यांची माहिती ः कोरोना योद्धा बनून कोविड रुग्णांसाठी मेहनत
कणकवली, ता.१० ः कोरोना संसर्ग काळातही १०८ रूग्णवाहिकेवर अविरत सेवा देणारे कोरोना योद्धा तथा रुग्णवाहिका चालकांचा कणकवलीत १५ ऑक्टोबरला सत्कार होणार आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये जिल्ह्यातील २८ चालकांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
श्री.नलावडे म्हणाले, गर्भवती महिलांची ने-आण तसेच कुठेही अपघात झाल्यानंतर तेथे क्षणात पोचणार्या १०८ रूग्णवाहिकेवरील चालकांनी, कोरोना संसर्ग काळातही महत्वाची भूमिका बजावली आहे. आघाडी सरकारने १०८ रूग्ण वाहिका सुरू केली. मात्र त्यावरील चालक अजूनही कायमस्वरूपी सेवेत रुजू झालेले नाहीत. तसेच चार-पाच महिने या चालकांना मानधन देखील मिळत नाही. अशा बिकट स्थितीमध्येही कोरोना योद्धा असलेले हे चालक अविरत सेवा देत आहेत.
या कोरोना योद्धांची दखल कणकवली नगरपंचायतीने घेतली आहे. जिल्ह्यातील १०८ वरील सर्व रुग्णवाहिका चालकांना १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहात गौरविण्यात येणार असल्याचे श्री.नलावडे म्हणाले.