वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम…
वेंगुर्ला,ता.१२:
सद्यस्थितीत कोरोना महामारीचा प्रभाव दिवसेदिवस वाढत असताना सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असलेल्या वेंगुर्ले तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानने सागर किनारा स्वच्छता उपक्रम राबवत आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपली आहे.
लॉकडाऊन कालावधीत कोरोना विषयक जनजागृती सोबतच रक्तदान शिबिर, तुळस घाटी स्वच्छता, महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण अशा समाजपयोगी उपक्रमांचे वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने यशस्वी आयोजन करण्यात आले. अशाच उपक्रमातून सामाजिक समरसता जपत पुन्हा एकदा वेंगुर्ले सागरेश्वर मंदिर परिसर आणि सागर किनारा स्वच्छता उपक्रम राबविला.
राज्यभर अनलॉक प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पर्यटकांची सिंधुदुर्गात वर्दळ सुरू झालेली दिसून येत असून सागर किनारे हे सिंधुदुर्गाची मुख्य पर्यटन स्थळे असल्याने अशा ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. यामुळेच वेंगुर्ल्यातील प्रमुख पर्यटन स्थळ व धार्मिक स्थळ असलेल्या सागरेश्वर याठिकाणी मंदिर परिसर आणि सागर किनारा स्वछता करण्यात आली.
यावेळी किनाऱ्यावर असलेला प्लास्टिक, काच, थर्माकॉल अशा दीर्घकाळ व पर्यावरण विघातक अशा स्वरूपातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. संकलित केलेला कचऱ्याची वेंगुर्ला नगरपरिषद च्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात येईल असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, मंगेश सावंत, सचिव गुरुदास तिरोडकर, महेश राऊळ, किरण राऊळ, रोहन राऊळ।,प्रशांत सावंत, प्रवीण राऊळ, ओंकार राऊळ,रोहित गडेकर,हेमलता राऊळ,अक्षता गावडे,सोनाली आंगचेकर आदी कार्यकर्त्यानी स्वछता उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.