भाजप महिला पदाधिकाऱ्याची निवेदनाव्दारे मागणी…
कणकवली, ता.१२ : महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. या साऱ्यांच्या विरोधात आवाज उठवूनही सरकार व मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत असा आरोप करत भाजपा कणकवली तालुका महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार आर जे पवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे. कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हास्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनाचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या पाठीशी राहत स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांचे निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही . यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे २२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे भाजपा महिला मोर्चा , महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात व त्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. तर महिला सुरक्षित त्वरित कडक कायदे बनविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपाच्या प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवन, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, पंचायत समिती उपसभापती दिव्या पेडणेकर, तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, शहराध्यक्ष प्राची कर्पे, साक्षी वाळके, जिल्हा कार्यकारणी सदस्य गीतांजली कामत, स्वाती राणे, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, मेघा गांगण, कविता राणे आदी उपस्थित होत्या.