Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याप्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश...

प्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश…

उदय सामंत; आजच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद…

सिंधुदुर्गनगरी ता.१२: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्याची भूमिका घ्यावी,आजचा जनता दरबार हा प्रशासन गतिमान करणे या उद्देशानेच घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. या जनता दरबारास जिल्हा वासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १२८ लोकांनी त्यांची गाऱ्हाणी या जनता दरबारामध्ये मांडली.
यावेळी व्यासपिठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होते.
लोकांची कामे जिथल्या तिथे करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घ्यावी असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, लोकांची कामे चांगल्या प्रकारे व लवकर पूर्ण केल्यास लोकांना समाधान वाटते. चांगले आणि वेळेत काम करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. एखाद्यास कार्यालयांमध्ये वारंवार खेटे मारावयास लावणे हे चुकीचे आहे. जर लोकांची कामे तातडीने मार्गी लागली तर त्यांना जनता दरबारामध्ये यावे लागणार नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकारी वर्गाने चांगले काम केले आहे. असेच काम नियमित पणे करावे. दर महिन्याच्या 12 तारखेला जनता दरबार भरवण्यात येईल. आज जनता दरबारमध्ये 128 अर्ज आले. पुढील वेळी यापेक्षा कमी अर्ज यावेत असे काम सर्वच अधिकारी वर्गाने करावे. आणखी काही महिन्यांनी जनता दरबार हा अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा दरबार असावा. एखाद्या अधिकाऱ्यांने माझे काम तातडीने केले त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आलो आहे. असे नागरिकांनी सागितले पाहिजे. आशा प्रकारे अधिकारी वर्गाने काम करावे. लोकांना जनता दरबार सारख्या ठिकाणी यावे लागू नये यासाठी काम करावे अशा सूचना पालकमंत्री श्री . सामंत यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात परतीच्या मान्सूनमुळे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्यासाठी तलाठी, कृषि सेवक, ग्रामसेवक यांना आदेश द्यावेत. राज्य शासनाने नुकसानीची मागणी केल्यानंतर तातडीने ती सादर करता यावी. अधिकारी वर्गाने जनता दरबार गांभिर्याने घ्यावा. या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. त्यामुळे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जर कोणी पुढील वेळेस अनुपस्थित राहीले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जनता दरबारच्या माध्यमातून मी अधिकारी वर्गाचे काम हलके करण्याचेच काम करत आहे. त्यासोबतच नागरिकांना योग्य न्याय मिळावा व त्यांची कामे तातडीने मार्गी लागावीत हा याचा उद्देश असल्याचेही पालकमत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
आजच्या या जनता दरबारामध्ये वैयक्तीक, महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग या विभागांविषयीच्या अर्जांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments