३ कोटी ५१ लाखाचा अपहार ः वैभववाडी शाखेतील प्रकार
कणकवली, ता.१२ ः सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेतील ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रक्कमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील संशयित उपशाखाधिकारी कल्पेश अशोक महाडीक रा. राजापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ आर. बी. रोटे यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता केली. संशयितातर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सन २०१४-२०२० या कालावधीत सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेत उपशाखाधिकारी या पदावर कार्यरत असताना संशयित कल्पेश महाडीक यांनी
आरोपी नं. १ प्रल्हाद मनोहर मांजरेकर याने तयार केलेल्या बनावट ‘ओडी’ कर्ज खात्यांची माहिती असतानाही ती मंजूर केली होती. तसेच प्रल्हाद मांजरेकर याने काही ओडी खात्यांची कर्जमर्यादा वाढविली असताना श्री. महाडीक यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता त्याला मंजूरी दिली होती. सहकर्मचारी मांजरेकर याने खातेदारांच्या नावे मोठ्या प्रमाणात रोख रक्कमा काढलेल्या व्यवहारांनाही श्री. महाडीक यांनी मान्यता दिली होती. काही कर्जदारांची बनावट कर्जखाती असतानाही त्याची खातरजमा न करता लाखो रुपयांच्या रक्कमा श्री. मांजरेकर यांच्या कुटुंबीयांच्या नावे गैरप्रकारे हस्तांतरित करतानाची मंजूरीही श्री.महाडीक यांनी दिली होती. सौ.प्रतीक्षा बागवे यांच्या नावे बनावट ओडी खाते श्री.मांजरेकर याने सुरू केले होते. श्री. मांजरेकर याची कणकवली शाखेत बदली झालेली असताना व शाखाधिकारी सौमित्र प्रभू हे वैद्यकीय रजेवर असताना कल्पेश महाडीक याने प्रभारी शाखाधिकारी म्हणून काम करताना सौ. बागवे यांच्या खात्याची कर्जमर्यादा १ कोटी १६ लाख एवढी वाढविली होती. तसेच सदर खात्यातून ५० लाख १३ हजार ४८ रुपये अचानक दुसर्या खात्यात अनाधिकारी वर्ग केले होते. याबाबत श्री. मांजरेकर याचेविरूद्ध बँक शाखाधिकारी निलेश वालावलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलिस स्थानकात भादंवि कलम ४०६, ४०९, ४१८, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ अ, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तपासात तत्कालीन शाखाधिकारी सौमित्र प्रभू व उपशाखाधिकारी अल्पेश महाडीक व श्री. मांजरेकर याची पत्नी यांनाही आरोपी करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान, श्री. मांजरेकर याच्या अटकेनंतर श्री. महाडीक यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने श्री. महाडीक याची ५० हजारांच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये अशा अटी घातल्या आहेत.