बाबा मोंडकर ; बंदर विभागाकडून वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर…
मालवण, ता. १३ : टीटीडीएस संस्थेच्यावतीने जलक्रीडा व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत मालवण बंदर अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. या समस्या मार्गी लावण्यासाठी बंदर कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार बंदर कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी, क्यार, निसर्ग वादळाने संकटात असलेली किल्ला वाहतूक, बोटींग, वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग जलपर्यटन व्यावसायिक प्रचंड आर्थिक मेटाकुटीस आला आहे. हे व्यवसाय उभे राहण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. गेल्यावर्षीचा पूर्ण व्यवसाय बंद स्थितीत असल्याने यावर्षाची नौका सर्वेक्षण फी माफ करण्यात यावी, इन्शुरन्स हा व्यावसायिकांकडून न स्वीकारता ज्यावेळी बंदर विभाग प्रत्येक जलक्रीडा करताना पर्यटकांकडून कर आकारते. त्याचवेळी रेल्वे, बिएसटी, एसटी अन्य विभागाप्रमाणे हा इन्शुरन्स प्रति पर्यटकांकडून आकारावा, लेव्ही कर यावर्षी माफ करावा, प्रति व्यक्ती १ लाख असलेला इन्शुरन्स वाढवून प्रति व्यक्ती ५ लाख करण्यात आला. तो पूर्ववत १ लाख करण्यात यावा, प्रशासनाने सर्व जलक्रीडा व्यवसायायिकांची एकत्र बैठक घेऊन त्यांना मंजूर प्रवाशी क्षमतेच्या किती टक्के प्रवाशी वाहतूक करावी यासंबंधी चर्चा करून शासनाने अधिकृत परिपत्रक जाहीर करावे, व्यवसाय सुरू करताना आवश्यक कोव्हीड सुरक्षा किट सरकार मार्फत मोफत देण्यात यावे, स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांस मान्यता द्यावी, यावर्षीचा पर्यटन हंगाम व्यवस्थित न झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या व्यावसायिकांस आर्थिक मदत देण्यात यावी. हे विषय मार्गी लागले तरच या क्षेत्रातील व्यावसायिक उभारी घेऊ शकतो त्यामुळे बंदर कार्यालयाच्यावतीने वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. संस्थेच्या विनंतीनुसार स्थानिक प्रशासनाने यांची त्वरित दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे अशी माहिती श्री. मोंडकर यांनी दिली.
यावेळी रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.