सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्यमंडळ ः प्रांताधिकार्यांना निवेदन
कणकवली, ता.१३ ः दशावतार सादरीकरण बंद झाल्याने जिल्ह्यातील सुमारे ९० दशावतारी मंडळातील हजार ते बाराशे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दशावतार सादर करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्यमंडळाच्यावतीने आज करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्यमंडळाचे अध्यक्ष नाथा नालंग-परब, सचिव मारुती सावंत यांच्यासह दशावतारी कलावंत सुरेश गुरव, संजय लाड, दिलीप सामंत, अप्पा दळवी, लवू पुजारे, भास्कर सामंत, दिवाकर मेस्त्री, कृष्णा परब, सुंदर साटम, भूषण चव्हाण, गुरुनाथ मेस्त्री आदींनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील लोककलेची खाण म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात दशावतार, भजन, कीर्तन, फुगडी, धनगरी नृत्य, गोंधळी, ठाकर ( पांगुळनृत्य) अशा अनेक पारंपरिक लोककला मागिल अनेक वर्षापासून आपला वारसा टिकवून कार्यरत आहेत . त्यातील एक अग्रगण्य लोककला म्हणजे पारंपरिक दशावतार होय. कोरोनामुळे ही लोककला बंद आहे. काही दिवसांनी पारंपरिक जत्रोत्सव उत्सव सुरू होणार आहेत. त्यामुळे दशावतार सादर करण्यास परवानगी द्या अशी आम्ही संघटनेच्यावतीने मागणी करत आहोत.
मार्च २०२० पासून संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. यात दशावतारही बंद झाला. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सुमारे ९० दशावतार मंडळे आणि त्यामध्ये एक हजार ते बाराशे कलाकार यांची रोजीरोटी बंद होऊन उपासमारीची परिस्थिती आलेली आहे. त्याचप्रमाणे गावोगावी होणार्या वार्षिक जत्रोत्सवांना सादर होणारी दशावतार परंपरा न दाखवल्याच त्या गावकर्यांना आणि दशावतार कलाकारांना दैवी प्रकोपाला कदाचित सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी वरील सर्व बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने या पारंपरिक कलेला येत्या नोव्हेंबर २०२० या महिन्यापासून योग्य त्या अटी व शर्ती सहित चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.