दोघे जखमी; परिसरात गतिरोधक उभारण्याचा मुद्दा, पुन्हा ऐरणीवर…
बांदा,ता.१३:
बांदा-शिरोडा मार्गावर मडुरा तिठ्यावर मोटारसायकल व एक्टिव्हा यांच्यात भिषण अपघात झाला असून यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. आज सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. दोन्ही दुचाकींच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तिठ्यावर गतीरोधक उभारण्याची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याने बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच सदर अपघात झाल्याचे उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.
मडुरा तिठा येथे एकाच ठिकाणी चार रस्ते एकत्रित येतात. त्यामुळे याठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असल्याने गतिरोधकाची मागणी होत आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मडुऱ्याहून निगुडेमार्गे सोनुर्लीला जाणारा मोटारसायकलस्वार व पाडलोस मार्गे बांदा येथे जाणारा एक्टिव्हास्वार दोन्ही भरधाव वेगाने जात होते. तिठ्यावरील चार रस्त्यांवर दोन्ही दुचाक्या अचानक समोर आल्याने अपघातग्रस्त झाल्यात. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.