रात्रीची कारवाई; बंदुक, ७ काडतुसासह स्काॅर्पिओ कार जप्त…
देवगड,ता.१४: शिरगाव परिसरातील जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच जणांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक बंदूक,सात जिवंत काडतुसे आणि एक स्कॉर्पिओ कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई काल रात्री देवगड-शिरगाव चेकपोस्ट येथे करण्यात आली.संभाजी परब (रा.अणाव),गीतेश चव्हाण (रा.देवली) ,गुरुदत्त खोबरेकर (रा.कवठी), शंकर पालव (रा.अणाव),वीरेंद्र पालव (रा.अणाव),अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,देवगड पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आपली ड्युटी बजावत असताना हे पाचही जण कार मधून आले.दरम्यान त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता सात जिवंत काडतुसे आणि एक बंदूक आढळून आली.त्यामुळे संबंधित संशयित हे शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.