तात्काळ कारवाई न झाल्यास धडक मोर्चा : मनसेचा ईशारा…
वेंगुर्ला,ता.१४: तालुक्यात राजरोसपणे मटका, जुगार, दारूधंदे या सारखे अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल, असा ईशारा लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलिस ठाणे आणि तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
सध्या वेंगुर्ला शहरासोबतच वेंगुर्ला तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारु धंदे, मटका, जुगार, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे.आधीच कोरोना काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांमध्ये निराशा आहे.आज अनेक भागात गोवा बनावटीची दारू विक्री व अनधिकृत वाहतूक होत आहे. यामुळे तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. कुटुंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या पोलिस स्थानकाच्या अखत्यारीत येत असणार्या अनधिकृत दारु धंदे, गोवा बनावटीच्या दारू विक्री, मटका, जुगार ,अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास या निवेदनाद्वारे कळवु इच्छीतो,वरील दिलेले सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यात यावेत.अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल, आणि उद्भवणार्या परिस्थितीस आपणच जबाबदार रहाल असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पोलिस व तहसीलदार कार्यालयात मनसे तालुकाध्यक्ष गोपाळ (सनी) बागकर तसेच आबा परब उप जिल्हाध्यक्ष, आबा चिपकर तालुका सचिव, शैलेश बागकर, विशाल मांडये , देवेंद्र फोडनाईक शाखा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.